Monday 13 October 2014

Posted by samirsinh dattopadhye on 05:24 No comments
Aniruddha-bapu-Anubhav-sankirtan-satara
- नीलम महाजन, ता.पाटण. जि. सातारा 
जगात वावरताना आपण अनेक संकटांच्या छायेत वावरत असतो. विविध भयांचा भार घेऊन जगत असतो, परंतु एकदा मायबाप सदगुरुंच्या  छत्रछायेखाली आलो की सर्व चिंता-भयभार हा त्यांच्यावर सोडून द्यायचा असतो व आपण केवळ त्याने सांगितलेल्या मार्गावरून चालत जायचं असतं. मग तो आपला सर्व भार उचलतोच, हा बापुभक्तांना येणारा नित्य अनुभव आहे....

मी सन २००९ साली सद्गुरु बापूंच्या उपासनेत आले; आले म्हणण्यापेक्षा पुढील जीवनातील अनेक खडतर प्रसंगांमध्ये मला मार्गदर्शन करण्यासाठी बापूंनीच मला आणले, असे म्हणणे योग्य ठरेल. मी उपासनेला सर्वप्रथम गेले, तेव्हा पाटण उपासना केंद्र प्रायोगिक तत्त्वावर चालत असल्याने, बापू-आई-दादांचा फोटो समोर ठेवून सुंदर अशी उपासना शिस्तबद्धतेने, तरीही प्रेमाने चालू होती. प्रथमच हे सर्व ऐकायला खूप छान वाटले व दर शनिवारी येण्याची ओढ लागली. उपासना करताना, तेथील स्वयंसेवकांकडून व इतर भक्तांकडून बापूंबद्दल ऐकताना त्यांना बघण्याची ओढ निर्माण झाली.

नेमकी एका गुरुवारी हॅपी होमला गेल्यानंतर तिथे सुचितदादांचे दर्शन घडले, पण बापूंचे दर्शन काही झाले नाही. मी जरा खट्टू झाले. पण तेथील बापूभक्तांनी, आज प्रवचनाचा दिवस असल्याने प्रवचनस्थळी बापूंचे दर्शन होईल, असे सांगून संध्याकाळी न्यू इंग्लिश स्कूल येथे प्रवचनास जाण्यास सांगितले. मुंबईची जास्त माहिती नसल्याने तेथे जाण्यास खूप उशीर झाला व तेथील अलोट गर्दी पाहून आता आपल्याला बापूंना लांबूनच पहावे लागणार असे मनात वाटून गेले. एक प्रयत्न करायचा म्हणून - आम्ही खूप लांबून व पहिल्यांदा आल्याने, बापूंना जवळून पाहण्याची इच्छा असल्याचे तेथील कार्यकर्त्यांना सांगताच त्यांनी गेटजवळ थांबण्यास सांगितले. ‘सर्व काळजी बापूंवर सोडा....तुम्ही फक्त श्रद्धा व सबूरी ठेवा. बापू नक्की दिसतील जवळून’ असे त्यांनी सांगितले. ते कार्यकर्ते हे बोलले खरे, पण आतील हॉल तर पूर्ण भरलेला असल्याने बापूंचे कसे काय जवळून दर्शन होणार, असा विचार सारखा मनात डोकावत होताच. तेवढ्यात त्याच कार्यकर्त्यांनी येऊन आम्हांला स्टेजसमोर पुष्पवृष्टीसाठी उभे केले. अशा रितीने बापू-आई-दादांना जवळून डोळे भरून पहायला मिळाले. बापू आपल्या भक्ताची उचित अशी छोट्यातली छोटी इच्छाही पूर्ण करतात, हे मी त्यावेळेस प्रत्यक्ष अनुभवले.

दुसरा अनुभव - मुंबईला दुसर्‍यांदा येण्याचा योग आला २००९च्या अनिरुद्ध पौर्णिमेला. मुलुंड येथे अनिरुद्धपौर्णिमेचा उत्सव होता. मी व माझी मावस नणंद उत्सवाकरिता आलो होतो. खरं मुंबईची तर काहीच माहिती नव्हती, पण बापूंवर सर्व सोडून आम्ही इतक्या लांब आलो होतो.

माझी बहीण ठाण्याला राहते. तिने आम्हाला तिच्याकडे? उतरण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही दोघी तिथे गेलो. जाताना पाऊस पडत असल्यामुळे आम्ही आमचे बॅजेस पर्समध्ये काढून ठेवले. ह्या मुंबई भेटीत अजून एक काम करायचे होते - कुर्ला येथून मावस दिरांच्या गोळ्या घेऊन यायच्या होत्या. तसे बहिणीशी बोलल्यावर - ठाणे ते कुर्ला डायरेक्ट बसमध्ये बसवून देण्याचे तिच्या दिराने सांगितले. त्याप्रमाणे एका बसमध्ये त्यांनी आम्हाला बसविले. पण बस चालू झाल्यावर ही बस कुर्ल्यास जात नसल्याचे कंडक्टरकडून कळले. तेव्हा तर ‘बापरे, आता पुढे काय’ ह्या कल्पनेने अक्षरशः ब्रह्मांड आठवले. पर्समधला - बापूंचा फोटो असलेला बॅज काढून डोक्याला लावला व बापूंचा धावा सुरू केला. 

कंडक्टरला कुर्ल्यास कसे जायचे ते विचारले असता त्याने एका ठिकाणी उतरविले व तेथून दुसरी बस पकडण्यास सांगितले. बर्‍याच वेळाने ती बस आली. तिथून आम्ही कुर्ल्यास गेलो परंतु तासभर शोधले तरीही हॉस्पिटल सापडत नव्हते. पत्ता दाखविल्यानंतर ‘इथेच पाच मिनिटाच्या अंतरावर आहे’ असे उत्तर मिळे, पण ते सापडत मात्र नव्हते. शेवटी चालून थकल्यानंतर एका रिक्षास विचारले तर तोही म्हणाला की ‘इथेच ब्रिज पास केल्यानंतर वेस्ट साईडला हॉस्पीटल आहे. तुम्ही रिक्षा कशाला करता?’ पण आम्ही दमलो होतो म्हणून त्याच्याच रिक्षाने ब्रिजपर्यंत गेलो. ब्रिज पास केल्यानंतर वेस्टला आल्याची खात्री केली व दुसरी रिक्षा विचारली. तर त्यानेही पाच मिनिटांवर हॉस्पीटल असल्याचे सांगितले. तरीही आम्ही रिक्षा केली. जाता जाता रिक्षा ड्रायव्हरशी बोलता बोलता, ‘येथून मुलुंडला थेट बस जात नाही व बसेस बदलून जाता जाता तुम्हाला तीन चार तास जातील, तेव्हा तुम्ही रेल्वेने जावे’ असे त्याने सुचविले.

अखेर हॉस्पिटल आले. आम्ही रिक्षातून उतरलो. हॉस्पिटलमध्ये पाऊल ठेवताक्षणीच बाकावर एक व्यक्ती बसली होती त्यांच्याकडे माझे लक्ष गेले आणि मी उडालेच! ती व्यक्ती अगदी सुचितदादांसारखीच दिसत होती!

थोड्या वेळाने त्या व्यक्तीने अचानक आम्हाला ‘हरि ॐ’ असे म्हणत ‘तुम्ही बापूंकडे जाऊन आलात का?’ असे विचारले. आम्ही ‘हो’ म्हटले व ‘आता औषधे घेऊन तिकडेच जाणार आहोत’ असे सांगितले. त्यांना मी जाण्याचा मार्ग विचारल्यानंतर त्यांनीही ‘ट्रेनने जा’ असेच सांगितले. इतकेच नव्हे, तर ‘मीही तिकडेच जाणार असल्याने आपण बरोबरच जाऊया’ असेही सांगितले. पण माझ्या मनात सतत त्यांच्याविषयी संशय येत होता की त्यांच्यावर विश्‍वास कसा ठेवायचा की ते बापूभक्त आहेत? कारण त्यांच्याकडे बापूंचा फोटो असलेला बॅज, पेन, लॉकेट असे आम्हांस काहीही दिसत नव्हते. त्यामुळे विश्‍वास ठेवायला मन तयार होत नव्हते. पण मला किंवा नणंदेलाही, ट्रेनचे तिकीट कसे काढायचे, कोणत्या प्लॅटफॉर्मवर उभे रहायचे, कोणती ट्रेन पकडायची काहीच माहीत नव्हते. अशा परिस्थितीत बापूंना मनोमन कळकळून हाक मारली व ‘तुम्हीच आता व्यवस्थित घेऊन चला’ असे सांगितले आणि आम्ही त्या व्यक्तीबरोबर निघालो. ती व्यक्ती पुढे चालत होती व आम्ही दोघी त्यांच्या पाठीमागे. ते बोलत होते की ‘एकदा पेशंटला घेऊन बापूंकडे या. मग बघा, त्यांच्या गोळ्या-औषधे बरीच कमी होतील.’ 

असे बोलत बोलत स्टेशन आले. त्यांनी मला तिकीट काढायला कुठे-कसे उभे रहायचे ते दाखवले. पण तिकीट मात्र स्वतःच काढले. मी पैसे देऊ करताच ते म्हणाले, ‘‘बाळांच्या खाऊसाठी जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे तिकीटाला गेले.’’ मी तिकीटे मागितली परंतु त्यांनी दिली नाहीत. पुन्हा माझ्या मनात संशय की ती तिकीटे नक्की मुलुंडचीच आहेत ना? 

गाडीला गर्दी होती. आम्ही आत गेलो. जागा झाल्यानंतर त्यांनी स्वत: न बसता आम्हा दोघीस बसायला दिले. स्टेशने जात होती. तेवढ्यात मुलुंड आले व मी मनोमन आनंदले. आम्ही स्टेशनवर उतरलो व बाहेर आलो. तेव्हा तेथून बापूंकडे जाण्यास फ्री बसेस असल्याचे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे आम्ही बसमध्ये बसलो. परंतु उत्सवस्थळ आल्यावर खाली उतरल्यावर ती व्यक्ती कुठे गेली ते दिसलेच नाही. आम्ही खूप वेळ शोधूनही ते सापडले नाहीत.

तिसरा अनुभव - माझे लग्न होऊन नऊ वर्षे झाली, तरीही मला अजून मूल नव्हते. खूप दवाखाने झाले. प्रत्येक ठिकाणाहून एकच उत्तर येई - ‘काही दोष नाही. सर्व काही ठीक आहे.’ परंतु रिझल्ट मात्र मिळत नसे. शेवटी एक दिवस दादांना दाखवायचे ठरविले. त्याप्रमाणे दादांकडे गेल्यानंतर दादांनी अतिशय शांतपणे सांगितले - ‘‘३ महिने गोळ्या घ्या. काहीही काळजी करू नका. सर्व काही ठीक होईल.’’ दादांच्या शब्दांनी मोठा आधार मिळाला. 

कालांतराने मला दिवस गेले. एवढे दिवस सर्व डॉक्टरी उपाय करूनही जे शक्य झाले नव्हते, ते त्या सद्गुरुरायाच्या कृपेने शक्य झाले होते. मी बापूंचे मनोमन आभार मानू लागले. 

मला आठवा महिना चालू होता. एकदा मी घरातल्या जिन्याच्या वरच्या पहिल्या पायरीवर उभी होते. कसे काय कोण जाणे, पण मी अचानक पहिल्या पायरीवरून चौथ्या पायरीवर आले व जमिनीवर पडले. माझ्या मिस्टरांनी पाहिले व ते धावत येऊन मला उठविण्याचा प्रयत्न करू लागले. मी स्वत: सावरत त्यांना आपली संस्थेची उदी आणण्यास सांगितले. उदी पहिल्यांदा पोटाला लावली. ‘घोरकष्टोद्धरण स्तोत्र’ म्हटले व नंतर पाण्यात टाकून प्याले. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरही ओरडल्या, ‘‘आठवा महिना चालू आहे आणि काळजी घेता येत नाही का?’’ 

पण बापूंच्या कृपाशीर्वादाने मला व माझ्या बाळाला काहीही झाले नाही. २२ मे २०१३ रोजी मला छान मुलगा झाला. दादांना विचारून त्याचे नाव ‘ऋषिकेश’ असे ठेवले.

खरंच, आज एक विश्‍वास मनात जागृत झाला आहे की मी ह्या बापूंचे बाळ आहे आणि बापूराया मला कधीही टाकणार नाही. 
मी अंबज्ञ आहे. आम्ही अंबज्ञ आहोत.
॥ हरि  ॐ॥
 
Categories: ,

0 comments:

Post a Comment